नागपूर -क्रिकेट आणि दहशतवादाचा खेळ एकत्र खेळला जाऊ शकत नसल्याचे रामदेव बाबा म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होणे राष्ट्रहित आणि राष्ट्रधर्माच्या विरुद्ध आहे. रामदेव बाबा नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता विमानतळावर पत्रकारांना प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते.
प्रतिक्रिया देताना रामदेव बाबा हेही वाचा -'बालभारती'कडून कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची रद्दीत विक्री; माहितीच्या अधिकारातून धक्कादायक खुलासा
नशा विनाशकारी -
सध्या देशभरात गाजत असलेल्या आर्यन खान प्रकरणावर देखील रामदेव बाबा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रामदेव बाबा म्हणाले की, बाॅलिवुडमध्ये सुरू असलेला नशेचा विनाशकारी खेळ देशाच्या युवा पिढीसाठी अतिशय घातक आहे. व्यसने आणि नशेला अशा पद्धतीने ग्लॅमराईज करणे चुकीचे आहे. आपले रोल माॅडल, आयकाॅन, आणि आयडियल मानणाऱ्या स्टार्सना अशा प्रकारच्या कारस्थानात फसलेले पाहून लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे, बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकांनीच कचरा साफ केला पाहिजे. योगापासून रोगमुक्ती, नशा मुक्ती, सर्व प्रकारची साधन शुचिता, अनैतिकता मुक्तीची मोहीम चालवत असल्याचेही रामदेव बाबा यांनी सांगितले.
पेट्रोलचे भाव कमी होतील
सरकारला आपली अर्थव्यवस्था मजबूत करतानाच राष्ट्र हिताचे सामाजिक उपक्रम सुरू ठेवायचे आहे. सरकार समोर वेगवेगळी आर्थिक आव्हाने आहेत. त्यांना सरकारही चालवायचे आहे. म्हणून ते इंधनावरील कर कमी करू शकत नाही, मात्र कधी ना कधी पेट्रोल, डिझेलचे दर कमी होईल, असे भाकीतही बाबा रामदेव यांनी वर्तवले. काळेधन, भ्रष्टाचार, व्यवस्था परिवर्तनासंबंधी आम्ही संपूर्ण देशात आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी मी काही उपाय सांगितले होते. वेगवेगळ्या आर्थिक सुधारणांसोबतच क्रुड ऑईलच्या दरांनुसार पेट्रोलची विक्री केली जावी, त्यावरील कर कमी करण्यात यावे आदी उपाय सांगितले होते. आताही हे केले तर पेट्रोल व डिझेलचे भाव कमी होईल, असे रामदेव बाबा म्हणाले.
योग आणि आयुर्वेद आजही सर्वश्रेष्ठ
अलोपॅथीच्या तुलनेत योग आणि आयुर्वेद आजही सर्वश्रेष्ठ आहे. तातडीचे उपचार आणि शस्रक्रिया वगळता ९८ टक्के रोगांचा परिणामकारक आणि स्थिर उपचार योग आणि आयुर्वैदात होतो. पतंजलीने एकात्म उपचार पद्धती विकसित केली आहे. पतंजलीचा नागपुरातील फूडपार्क यावर्षी सुरू करू, अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली.
हेही वाचा -नागपूर व गडचिरोली परिक्षेत्राचा गृहमंत्र्यांकडून आढावा, दोष सिध्दीचे प्रमाण वाढेल असा तपास करा - वळसे पाटील