नागपूर - शहरातील यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माजरी रेल्वे पुलाजवळ एका २७ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. रियाजउद्दीन जलालउद्दीन अन्सारी असे मृत तरुणाचे नाव असून अजहर, मोहम्मद जावेद आणि मुशीर नामक तीन आरोपींनी त्याचा खून केला. क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादातून आरोपींनी संगनमत करून रियाजउद्दीन अन्सारी याचा खून केला. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.
तत्काळ अटक
सोमवारी रात्री उशिरा यशोधरा पोलिसांना माहिती सूचना मिळाली, की मांजरा पुलाजवळ दोन गटात हाणामारी झालेली आहे. या सूचनेच्या आधारे पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा एका तरुणावर चाकूने हल्ला झालेला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच रियाजउद्दीन जलालउद्दीन अन्सारी नामक तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याच परिसरात लपून बसलेल्या अजहर, मोहम्मद जावेद आणि मुशीर नामक तीन आरोपींनी अटक केली.