नागपूर- खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकांच्या सुविधेसाठी व कोरोनाच्या संकटाला दूर ठेवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागतकाळातच राज्य सरकारने रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. कोरोनाची तीव्रता कमी झालेली असली तर धोका मात्र टळलेला नाही. हे नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोरोना योद्धा व जनतेच्या सहभागामुळे राज्यातील जनतेनी खूप मोठ्या प्रमाणावर कोरोनावर मात केली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी कोरोनाच्या प्रसारासाठी कुठेही संधी मिळू नये, यासाठी या संचारबंदीचा फायदा होणार आहे. यासाठी राज्य सरकारने रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राज्याच्या नागरिकांच्या हितासाठी व आरोग्यासाठी हितकारक असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
रात्रीच्या संचारबंदीमुळे राज्यातील जनतेने घाबरू नये- हेही वाचा-राज्यात ३ हजार ५८० नवीन कोरोनाग्रस्तांची वाढ; ८९ रुग्णांचा मृत्यू
रात्रकालीन संचारबंदी दरम्यानचे नियम
रात्रीच्या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री सुरू राहणारे कार्यालये व प्रतिष्ठाने वगळता हॉटेल, पब, सिनेमागृहे रात्री ११ वाजता बंद करावी लागणार आहेत. या संचारबंदीतून वैद्यकीय सेवा तसेच अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. या काळात मोटरसायकलवर एकटे किंवा दोघेजण प्रवास करू शकणार आहेत. चारचाकी वाहनेही चालविता येणार आहेत. परंतु या वाहनांमध्ये चारपेक्षा अधिक लोक राहणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. मॉर्निंग वॉक किंवा रात्री कामानिमित्त कुठे जायचे असल्यास त्यासाठी कोणतेही बंधने नसल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना काळात जनतेची सकारात्मक सहकार्य मिळालेले आहे. या पुढील काळातही हे सहकार्य मिळेल, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे 643 नवे रुग्ण, 12 रुग्णांचा मृत्यू
मुंबईतील मृतांचा आकडा 11 हजारावर -
मुंबईत आज (गुरूवारी) कोरोनाचे 643 नवे रुग्ण आढळून आले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 89 हजार 204 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 045 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 711 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 69 हजार 294 वर गेला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 011 सक्रिय रुग्ण आहेत.