नागपूर :अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठराखण केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत नागपूरातील खाजगी रुग्णालय अलेक्सिसमध्ये उपचार घेत होते. त्यानंतर ते 14 दिवस विलगीकरणात होते. यादरम्यान ते कोणालाच भेटले नाहीत, असेही पवार म्हणाले. मात्र १५ फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेवरुन फडणवीसांनी देशमुखांना कोंडीत पकडले आहे.
गृहमंत्री जर रुग्णालयातून सुट्टी होत असताना विलगीकरणात होते, तर त्यावेळी ते पत्रकारांशी बोलूच कसे शकतात? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी खुर्चीवर बसून माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी थेट विमानतळावर निघून जात मुंबईला रवाना झाले.
१५ फेब्रुवारीची पत्रकार परिषद.. फडणवीसांचे ट्विट..
"15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. मात्र, 15 तारखेला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रकार परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?" असा सवाल फडणवीसांनी ट्विट करत विचारला.
देवेंद्र फडणवीसांचे ट्विट.. अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण..
फडणवीसांच्या आरोपांवर स्पष्टीकरण.. यानंतर अनिल देशमुखांनी एक व्हिडिओ जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. १५ फेब्रुवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपण जेव्हा बाहेर आलो, तेव्हा माध्यम प्रतिनिधी तेथेच उपस्थित होते. त्यामुळे त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असे देशमुखांनी म्हटले आहे. यानंतर मी १५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारीला मी पहिल्यांदा घराबाहेर पडून मुंबईमधील सह्याद्री गेस्ट हाऊसला गेलो, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी