नागपूर - नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टी भागात एका तरुणाची हत्या झाली आहे. शुभम उर्फ भुऱ्या नानवटे असे हत्या झालेल्याचे नाव असून त्याच्या हत्येचा संशय त्याची आई आणि भावावर आहे. जखमी झालेल्या भुऱ्याचा उपचारादरम्यान घरीच मृत्यू झाला, असा बनाव करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात भुऱ्याची हत्या गळा आवळल्याने झाल्याचे निष्पन्न होताच नंदनवन पोलिसांनी भुऱ्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भुऱ्याची आई रंजना अशोक नानवटे आणि विक्की उर्फ नरेंद्र यांना ताब्यात घेतले आहे.
माहिती देताना पोलीस निरीक्षक किशोर नगराळे हेही वाचा -Nagpur Grand Marathon : नागपूर महामॅराथॉनमध्ये 'भेदभाव सोडा' असा संदेश देत धावल्या मायलेकी
रंजना अशोक नानवटे या दोन मुलांसोबत नंदनवन झोपडपट्टी भागात राहतात. त्यांचा मोठा मुलगा विक्की उर्फ नरेंद्र हा नागपुरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत कामाला आहेत, तर दुसरा मुलगा शुभम उर्फ भुऱ्या हा कोणतेही काम - धंदे करत नसून तो दारूच्या आहारी गेलेला होता. त्यामुळे, तो रोज घरी वाद घालायचा.
हत्येचा घटनाक्रम
भुऱ्याने गेल्याच महिन्यात एका मुलीशी लग्न केले होते. शनिवारला (१२ मार्च) शुभमने दारूच्या नशेत घरी वाद घातला. पत्नीची सोनोग्राफी टेस्ट करायची असल्याने तो आईकडे पाच हजारांची मागणी करत होता. मात्र, पैसे नसल्याने त्याच्या आईने नकार दिला, त्यामुळे तो आणखीच संतापला होता. रंजना नानवटे यांनी भुऱ्याच्या त्रासाला कंटाळून मोठा मुलगा विक्की याला बोलावून घेतले. विक्की घरी येताच दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळून आला तेव्हा रागाच्या भरात भुऱ्याने स्वतःच्या डोक्यात वीट मारून घेतली, असे भुऱ्याच्या आईने तक्रारीत सांगितले. भुऱ्याचा भाऊ विक्कीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, प्राथमिक उपचारानंतर भुऱ्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. रात्री भुऱ्याला झोपवण्यात आले, मात्र सकाळी त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी सांगितली.
शवविच्छेदनाच्या अहवालात हत्या झाल्याचे स्पष्टे-
भुऱ्याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याची पत्नी निकीताने नंदनवन पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भुऱ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केला. आज पोलिसांना शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये भुऱ्याचा मृत्यू हा गळा आवळल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या आधारे नंदनवन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ज्यावेळी भुऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा घरात त्याची आई आणि भाऊच असल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावला आहे.
हेही वाचा -स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करून निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करेल - विजय वडेट्टीवार