मुंबई - रिक्षा चालक रमेश साहू यांचा लायसन्स आणि बॅच बिल्ल्याचा गैरवापर करून एका अनोळखी इसमाने नवीन रिक्षा नोंदणी केली. या संदर्भात दोन वर्षांपूर्वी अंधेरी आरटीओकडे तक्रार केली असता, साहू यांची रिक्षा आरटीओने जप्त केली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने 'अंधेरी आरटीओ रिक्षा परवाना घोटाळा; चोराला सोडून संन्याशाला फाशी' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर आता भाजप टॅक्सी रिक्षा सेलने या प्रकरणाची दखल घेतली असून, साहू यांना न्याय मिळून देण्यासाठी मंगळवारी अंधेरी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -Holi Of Artists : बॉलीवूडने घेतला एनसीबीचा धसका ? सर्व कलाकारांची होळी घरीच साजरी
परवाना घोटाळ्याची चौकशी करा-
भाजप टॅक्सी रिक्षा सेलचे अध्यक्ष के.के तिवारी यांनी सांगितले की, रिक्षाचालक रमेश साहू यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे. अंधेरी आरटीओ रमेश साहू प्रकरणात आपली चूक मान्य करण्यास नकार देत आहे. त्यामुळे, आम्ही अंधेरी आरटीओ, परीवहन आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून 22 मार्च 2022 पर्यंत रिक्षा चालक रमेश साहू यांच्या लायसन्सचे लबाडीने गैरवापर करून अनोळखी इसमाने केलेल्या फसवणुकीची तात्काळ चौकशी करून, रमेश साहू यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. जर साहू यांना 22 मार्च 2022 पर्यंत न्याय मिळाला नाही, तर अंधेरी आरटीओ कार्यालयासमोर रमेश साहूबरोबर आम्ही आंदोलन करू, असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.
रमेश साहू यांनी याबाबत जेव्हा आरटीओकडे तक्रार केली. तेव्हा दोन्ही रिक्षा आरटीओमध्ये जमा करण्यात आले होते. तेव्हा आरटीओने या दोन्ही रिक्षांची चौकशी करून दोषी रिक्षा चालकावर तात्काळ नियमानुसार कलम 420 आणि 467 अंतर्गत गुन्हा नोंदविणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे, आरटीओ अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याची शंका आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.