नागपूर : येत्या तीन वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे सर्वोच्च दर्जाचे असतील असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान बोलून दाखविला. देशात वेगवेगळ्या 26 महामार्गांचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्रश्न - सर, हे फ्लेक्स इंजिन नेमके काय आहे- जगभरातील कंपन्या सध्या पेट्रोल इंजिनची वाहने बनवतात. ही वाहने बाजारात सध्या उपलब्ध आहेत. ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत मात्र ग्राहकांना आपल्या गाडीत शंभर टक्के पेट्रोल टाकायचे की इथेनॉल टाकायचे असे पर्याय आता उपलब्ध आहेत. बायो इथेनॉल हेही इंधन आहे आणि पेट्रोलही इंधन आहे. आपल्या देशात सध्या पेट्रोलचे दर शंभरच्या वर गेले आहेत. इथेनॉलचा दर मात्र पासष्ट रुपये आहे. इथेनॉल हे शेतातील उत्पादने जसे की ऊस, मोलायसिस, तांदूळ, मका आणि बायोमासद्वारे तयार केले जाते. आपण सध्या आठ लाख कोटींचे क्रुड आईल आयात करतो. येत्या पाच वर्षांत आपल्याला 25 लाख कोटींचे क्रुड आईल आयात करावे लागेल. आत्मनिर्भर भारतासाठी निश्चितपणे आपल्याला आयात कमी करण्याची गरज आहे. हाच पैसा शेतकऱ्यांच्या खिशात गेला तर खूप फायदा होईल. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगले इंधन आहे. इथेनॉलमुळे प्रदुषणाचे प्रमाण नगण्य म्हणावे इतके आहे. फ्लेक्स इंजिनमध्ये ग्राहकांना शंभर टक्के पेट्रोल टाकायचे की इथेनॉल टाकायचे हा पर्याय उपलब्ध असेल. सध्या असलेली पेट्रोल इंजिनची वाहने ही फ्लेक्स इंजिनमध्ये येतील. त्याची किंमत जगभरात सारखीच आहे. याला केवळ एक फिल्टर असते आणि मेटल वॉशर्सऐवजी रबर वॉशर्स असतात. तंत्रज्ञान उपलब्ध आहे. देशातील अनेक कंपन्यांनी हे तंत्रज्ञान अवगत केले आहे. टोयोटाने युरो सिक्स एमिशन नॉर्म्समध्ये फ्लेक्स इंजिन टेक्नोलॉजी जवळपास पूर्ण केली आहे. लवकरच ते आपले वाहन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे लोकांचा इंधनावरील खर्च कमी होईल, प्रदुषण कमी होईल तसेच शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. आत्मनिर्भर भारतासाठी हे एक मोठे यश असेल.
फ्लेक्स इंजिन हे खरेच सामान्यांसाठी जास्त दिलासादायक असेल का -निश्चितच. कारण पेट्रोलची गरजच कमी होईल. लोकांकडे पर्याय उपलब्ध असेल की पेट्रोल किंवा इथेनॉल. पेट्रोलचे दर जास्त असतील तर लोक इथेनॉल टाकतील. जास्त वाहने इथेनॉलवर चालतील. त्यामुळे याचा निश्चितच फायदा होईल असे मला वाटते.
नवीन येणाऱ्या भारत सीरिजच्या नंबरप्लेट या जुन्या गाड्यांवरही लागू होतील का -याविषयी आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र यात राज्यांनाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही आमचे धोरण तयार करून राज्यांना पाठविले आहे. ही योजना कार्यन्वित व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मात्र यात राज्यांनाही त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना आपला निर्णय घ्यावा लागेल.
येणाऱ्या काळात पेट्रोलची जागा इथेनॉल घेईल असे वाटते का -शंभर टक्के घेणार. कारण आधी इथेनॉल हे केवळ साखर कारखान्यांमध्ये मोलायसिसपासूनच बनत होते. नंतर शुगरक्यूट ज्युसपासून तयार व्हायला लागले. आता तांदूळ, मका, धान्ये तसेच शहरांतील जैविक कचऱ्यातूनही इथेनॉल तयार होईल. याशिवाय बायोमास जसे की शेतीतील जाळून टाकल्या जाणाऱ्या चाऱ्यासारख्या अपशिष्टांपासूनही इथेनॉल तयार होईल. जसजशी गरज वाढत जाईल तसतसे देशात इथेनॉलचे उत्पादनही वाढत जाईल. सध्या ऊसापासून साखर तयार होते. साखर सरप्लस आहे. सध्या चार टक्के मोलायसिस यातून निघतो. मात्र हे प्रमाण सात टक्क्यांपर्यंत वाढविले जाऊ शकते. त्यामुळे साखर कमी काढून मोलायसिस वाढविले तर इथेनॉलचे उत्पादन वाढविता येईल. यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. प्रदूषण कमी होईल. आयात कमी होईल आणि शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल.
शेतातील वेगवेगळे अपशिष्ट जाळून टाकल्याने प्रदूषण होते. त्यातून इथेनॉल तयार केल्याने किती फायदा होईल -अशा पाच टन अपशिष्टापासून एक टन बायो सीएनजी तयार होते. बायो सीएनजीऐवजी बायो एलएनजीही बनविता येते. कारण एलएनजी वाहतुकीसाठी सोपे असते. नागपुरातही याचे एक संयंत्र बसविले आहे. इथे सीएनजी बसेस सुरू केल्या आहेत. माझ्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर आहे जो सीएनजीवर चालतो. या ट्रॅक्टरमधून झाडांना पाणी देण्याचे काम आता आम्ही करणार आहोत.
मंत्रालयातील विविध कामांवर आपण नियंत्रण कसे ठेवता? व्यवस्थापन कसे करतातइथेनॉलविषयी मी 2009 पासून बोलत आहे. शेतीचे ऊर्जा क्षेत्रात रुंपातर करणे हे माझे मिशन आहे. प्रदुषणाच्या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. या सर्वांवर मात करण्याची माझी इच्छा आहे. माझा मतदारसंघ असलेल्या नागपूरला प्रदुषण नियंत्रणाच्या बाबतीत जागतिक बेंचमार्क यादीत न्यायचे आहे. नाग नदीच्या प्रदुषणाच्या नियंत्रणासाठी 2400 कोटींचा प्रकल्प आला आहे. सीएनजी, एलएनजी, इथेनॉल इंधन तसेच इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढल्यास वायू प्रदुषण कमी होईल. याशिवाय इतर शहरांतही आमचे असेच प्रयत्न सुरू आहेत. यामुळे देशातील प्रदुषणाची समस्या नक्कीच कमी होईल.
तुम्ही सातत्याने नवनव्या कल्पना मांडत असतात. या कल्पना नेमक्या येतात कुठूनया विषयासाठी मी समर्पित आहे. आताच एका बैठकीत ब्राझीलचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तसेच इथेनॉलचे तज्ज्ञ उपस्थित होते. ब्राझीमध्ये सध्या वायुदलाची विमाने 50 टक्के इथेनॉल मिश्रणावर उड्डाण करत आहेत. आता मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन आपल्याकडेही वायुदलाची तसेच प्रवासी विमानांत अशा प्रकारे 50 टक्के इथेनॉल वापराची विनंती करणार आहे. अलिकडेच एका विमानाने डेहराडून ते दिल्ली संपूर्णपणे बायोफ्युएलवर यशस्वीपणे उड्डाण केले आहे. आयातविरहित, प्रदूषणरहित व किफायतशीर व स्वदेशी तंत्रज्ञान हे भविष्य असल्याचे मी मानतो. सांडपाणी स्वच्छ करून सौर ऊर्जेच्या वापरातून हायड्रोजन व ऑक्सिजन विलग करून ग्रीन हायड्रोजनची निर्मित केली जावी यावर आम्ही विचार करत आहोत. उद्योगधंदे, वाहने यात या ग्रीन हायड्रोनजचा वापर केला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी लवकरच दिल्लीतही शंभर टक्के ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी खरेदी करणार आहे.