नागपूर -भारतीय वायुसेनेचा ८७ वा स्थापना दिवस आणि भारतीय वायुसेनेच्या मेंटनन्स कमांड मुख्यालयाच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने 'नागपूर एअर फेस्ट - २०१९' चे आयोजन करण्यात आले आहे. वायुसेनेतील लढाऊ विमानांचे आणि सारंग हेलिकॉप्टरचे सादरीकरण, 'सूर्यकिरण' विमानांचे थरारक सादरीकरण नागपूरच्या आकाशात करण्यात येणार आहे. एअर फेस्ट च्या माध्यमातून वायुसेना आपली ताकद दाखवणार आहे
गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरकर वायुसेनेच्या एअरफेस्टची आतुरतेने वाट बघत होते. मुख्य कार्यक्रम रविवारी (१० नाव्हेंबर) सकाळी ९.३० वाजता वायुसेनानगर येथे होईल. एअर फेस्ट पूर्वतयारी ८ नोव्हेंबरला करण्यात येणार असून यावेळी नागपूरच्या आकाशात 'सूर्यकिरण'चा थरार नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे सुखोई - ३० विमान हे देखील नागपूरच्या आकाशात आपल्या चित्तथरारक कसरती दाखविणार आहे. वायुसेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या एअर शोमध्ये सुखोई विमान सामील होत असल्याची ही पहिली वेळ आहे . सुखोई फायटर विमान जगातील सर्वात स्मार्ट आणि वेगवान लढाऊ विमानांपैकी एक आहे. सुखोईचे अत्याधुनिक मॉडेल टी - ५० सुखोई स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त आहे. सुखोईचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची गती आणि शत्रुला चकवा देण्याची क्षमता आहे.
भारतीय वायुसेनेतील लढाऊ विमानांचे सादरीकरणाच्या माध्यमातून युवकांना वायुसेनेकडे आकर्षित करण्याचा मानस आहे. 'सूर्यकिरण एरोबिक टीम' च्या वतीने 'एचजेटी - १६', 'किरण एमके', 'हॉक १३२', सारंग हेलिकॉप्टर आदी शिकाऊ विमानांसह आकाशात कलाबाजी सादर करण्यात येईल.
'आकाशगंगा स्काय डायव्हिंग टीम' आकाशातून पॅराशूटसह खाली उतरत आपला राष्ट्रध्वज फडकविणार आहे. 'एअर वॉरियर ड्रिल टीम' शस्त्रांसोबत रोमहर्षक सादरीकरण करण्यासाठी ओळखली जाते. हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरणार आहे.