नागपूर- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी आज नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी जोडे मारले.
राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर बाळबुधे आणि शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामागे त्यांच्याच पक्षातील नेते असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांची पवार साहेबांबाबत बोलण्याची त्यांची लायकी नाही, असे म्हणत पडळकर नागपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.