नागपूर- उपराजधानीच्या विविध भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने गेल्या २४ तासात महानगरपालिकेने शहरातील सहा वस्त्या सील केल्या आहेत.
सध्या, नागपुरातील सर्व दहा क्षेत्रांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये, याकरिता हे सर्व परिसर सील करण्यात आले आहेत. त्यामध्ये सतरंजीपुरा क्षेत्रामधील स्वीपर मोहल्ला, बिनाकी सोनार टोलीचा समावेश आहे. तर सोमवारी गड्डीगोदाम परिसरातील शबरीमाता नगर गोरेवाडा, धंतोली क्षेत्रामधील चंद्रमणी नगर आणि धरमपेठ क्षेत्रामधील एस. के. बॅनर्जी मार्ग हे परीसर सील केले आहेत. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश दिल्यानंतर हे परिसर सील करण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.