नागपूर- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनी सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांच्यासोबतचा फोटो शेअर करून 'थॅंक्यु गडकरीजी' अशी भावनिक पोस्ट शेअर केली. प्रत्येकवेळी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल आभार, असे संजय दत्तने लिहिले आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त शनिवारी (4 सप्टेंबर) नागपूरला येऊन गेले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी काढलेला फोटो संजय यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
अभिनेता संजय दत्तने शेअर केले नितीन गडकरींसोबतचे फोटो नागपूरातील फिल्मसिटीच्या चर्चेला बळ
अभिनेता संजय दत्त नागपूर दौऱ्यावर आले असताना जिल्ह्यातील रामटेक येथील खिंडसी या पर्यटन क्षेत्रालाही त्यांनी भेट दिली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे संजय दत्तसोबत होते. खिंडसी या ठिकाणी विदर्भ फिल्मसिटी उभारण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री राऊत यांच्या सोबतचा हा पाहाणी दौरा होता. त्याच दिवशी ते नागपूर विमानतळावरून मुंबईला जाणार होते. दरम्यान त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.
या भेटीसंदर्भात संजय दत्त यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि थॅंक्यु गडकरीजी म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्ट मध्ये त्यांनी, 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो कारण गेल्या काही वर्षांपासून तुम्ही मला वेळोवेळी मदत केली आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला पाठिंबा दिला आहे. मी ते कधीही विसरु शकणार नाही. धन्यवाद नितीन गडकरीं जी, तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद’ या शब्दात त्यांनी आपल्या भवना व्यक्त केल्यात.
अभिनेता संजय दत्तने शेअर केले नितीन गडकरींसोबतचे फोटो चार महिन्यात दुसऱ्यांदा नागपूर दौरा
संजय दत्त यांचा हा चार महिन्यातील दुसरा नागपूर दौरा होता. याआधी जून महिन्यात संजय दत्त नागपूरला येऊन गेले होते. तेव्हाही त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची सदिच्छा भेट घेतली होती. डॉ. राऊत यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ही भेट झाली होती. डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांचा २१ फेब्रुवारी २०२१ला रोजी विवाहाचा स्वागत समारंभ कोविड प्रादुर्भावामुळे रद्द झाला होता. तेव्हा कुणालाही येणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी संजय दत्त आले होते.