नागपूर- गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेलेल्या आरोपीला अटक करण्यात नागपूर पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. नरेश महिलांगे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव येथील छूईखदान परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर १६ गुन्ह्यांची नोंद असून नागपूर शहरात झालेल्या दोन मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.
नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार होता. नोव्हेंबर महिन्यात त्याला शहरातील हुडकेश्वर येथील गुन्हयात पकडण्यात आले होते. त्यावेळी आरोपी नरेशला कोव्हिड आजार निष्पन्न झाल्यामुळे उपचाराकरिता इंदिरा गांधी मेडीकल हॉस्पीटल येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. उपचारा दरम्यान ९ नोव्हेंबरला इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयातून पोलीस कस्टडीतून पळून गेला होता.
नागपुरातून फरार झालेला आरोपी छत्तीसगडमध्ये जेरबंद राजनांदगावच्या खैरीत लपला होता आरोपी-
आरोपी नरेश महिलांगे हा लकडगंज येथे दाखल एका गुन्हात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या निकटवर्तीय गुन्हेगारांची कसून चौकशी केली. त्यावेळी तो छत्तीसगड येथील राजनांदगावच्या
गाव खैरी येथे असल्याबाबत माहिती पुढे आली. त्यानंतर एक तपास पथक रवाना करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस राजनांदगाव येथे गेले असताना आरोपी हा गाव खैरीच्या छुईखदान येथे लपून असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपीला अटक केली आहे.
चोरीचा मुद्देमाल हस्तगत -
आरोपी नरेश महिलांगे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचा चौकशी केली, तेव्हा चोरी केलेल्या मुद्येमाला त्याने सहकारी आरोपी मुकेश रघुनाथ जांभुळकर यांचेकडे असल्याचे सांगितले. मात्र मुकेश हा सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती पुढे आली. त्याला अटक झाली तेव्हा लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण २ गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते. त्यानुसार आरोपीच्या गुन्हे अभिलेखाची माहिती घेतली असता, आरोपी हा नागपूर शहर , नागपूर ग्रामीण आणि गोंदिया शहर मिळून एकूण १४ गुन्ह्यात सध्या फरार घोषित होता. पोलिसांनी आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यातील एकूण ३,८५,००० रुपये हस्तगत केले आहेत.