नागपूर : हल्लीच्या युगात प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाईलमुळे अनेकांचे जीव जात असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. नागपुरातून अशीच एक घटना समोर आली आहे. आईने मोबाईल दिला नाही याचा राग आल्याने एका अल्पवयीन मुलीने थेट गळफास घेतल्याची घटना नागपुरात घडली आहे. नवव्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असल्याने संतापलेल्या एका आईने तिचा मोबाईल परत घेतला आणि जेवण केल्याशिवाय मोबाईल देणार नसल्याचे सांगितल्याने दुखावलेल्या त्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संस्कृता चंद्रशेखर सिंग असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
पाच दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू
संस्कृता चंद्रशेखर सिंग असे गळफास घेणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती नववीच्या वर्गात शिकत होती. आईने मोबाईल न दिल्याने राग आल्यानंतर तिने थेट गळफास घेतला. सुमारे पाच दिवसांपूर्वी संस्कृताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. कोविड-१९ चं संकट आणखी गडद होत असल्याने शाळा बंद आहेत. अशात विद्यार्थी ऑनलाइन वर्गाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण सुरू असल्याने आता मोबाईल फोन हा २४ तास विद्यार्थ्यांच्या हातातून सुटत नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे. संस्कृता ही सतत मोबाईलमध्येच गुंग राहत असल्याने तहान-भूकही विसरली होती. यामुळे तिच्या आईला चिंता वाटू लागली होती. संस्कृताने जेवण करावे यासाठी तिच्या आईने संस्कृता जवळील मोबाईल परत घेतला होता. जेवण झाल्यानंतर मोबाईल मिळेल असेही त्यांनी सांगितले होते. आईने मोबाईल घेतल्याच्या रागातून संस्कृताने टोकाचे पाऊल उचलत थेट गळफास घेतला. संस्कृताने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तिच्या आईने आरडाओरडा करून शेजारच्यांना बोलावून घेतलं आणि संस्कृताला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र पाच दिवस मृत्यशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेवर परिसरातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
विद्यार्थ्यांमध्येही तणाव वाढला
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थी घरीच राहून अभ्यास करत आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये विविध कारणांनी ताण-तणाव निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या चार दिवसांत नागपूरात दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना गेल्या काही काळात वाढल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांना मोबाईलचे असलेले आकर्षण, विविध गेम्सचे व्यसन ही यामागील कारणं असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी कला, क्रीडाप्रकारांमध्ये रस निर्माण करण्याचे प्रयत्न केले जावे असा सल्लाही तज्ज्ञ देतात.