नागपूर - बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर महानगरपालिका क्षेत्रातील पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. मागील ९ महिन्यांपासून या शाळा बंद होत्या. काही दिवसापूर्वीच ९ वी ते १२ वीच्या वर्गाला परवानगी देण्यात आली होती. तसेच पाचवी ते आठवी या ग्रामीण भागातील शाळांना मागील महिन्यात सुरुवात झालेली आहे. सोमवारपासून मनपा क्षेत्रातील शाळा सुरू झाल्या आहेत.
शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नियमांचं पालन करत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी शाळेत जाताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यामध्ये ६५ टक्के पालकांनी समर्थन पत्र दिल्याने पाल्यांना शाळेत पहिल्या दिवशी प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे इतर पालकांकडून जशीजशी संमती पत्र मिळत जातील तसतशी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांनाही झाला आनंद
मुलांपेक्षा शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद अधिक असल्याचे केशव नगर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप केचे म्हणाले. कारण शिक्षक म्हणनू प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याचा अनुभव हा वेगळा असतो. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. पण जो आनंद आज प्रत्यक्ष फळा खडू हातात घेऊन होतो तो आनंद मागील ९ महिन्यांपाून मिळालेला नाही, असेही शिक्षक म्हणाले.