नागपूर - संपूर्ण भारतात कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून नागपूरकडे बघितले जात आहे. या मागील कारणही तसेच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभावित जिल्हा म्हणून नागपूरचा समावेश झाला आहे. गेल्या महिनाभरापासून दरदिवशी साडेतीन ते चार हजार कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याने नागपूर कोरोनाच्या उद्रेक झालेला आहे. धक्कादायक म्हणजे १ मार्च ते ३१ मार्च दरम्यानच्या काळात तब्बल ७५७ लोकांचा मृत्यू हा कोरोनावरील उपचारादरम्यान झाल्याचे आकडे पुढे आले आहेत, यावरून नागपुरात कोरोनाची परिस्थिती किती भयावह झाली आहे, हे स्पष्ट होत असतानादेखील पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे.
भीती जणू नाहीशीच झाली
गेल्यावर्षी ११ मार्च रोजी नागपूरला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता, तिथून सुरू झालेला प्रवास आज २ लाख २६ हजार ३८ पॉझिटिव्ह रुग्णाच्या एकूण संख्येवर येऊन पोहोचला आहे. २०२० या वर्षात कोरोना विषाणूंनी अक्षरशः नागपूरसह विदर्भात धुमाकूळ घातला होता, ज्यामुळे वर्षभर नागरिक शासनाच्या बंधनात अडकून होते, मात्र परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येत असताना २०२१ या वर्षाच्या सुरुवातीला मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने टप्याटप्याने सूट देण्यास सुरुवात करताच नागरिकांमध्ये कोरोनाची भीती जणू नाहीशीच झाली होती. दिवसागणिक लोकांमध्ये बेफिकीरचे वातावरण निर्माण होत असल्याने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सोशल गॅदरिंगसह सार्वजनिक ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली. यादरम्यान कोविड नियमांचे पालन होत नसल्याने फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली होती. मार्च महिना सुरू झाल्यापासून तर नागपुरात कोरोना आउट ऑफ कंट्रोल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
फेब्रुवारी, मार्च महिन्यातील तुलनात्मक आढावा
फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीचा नागपूर कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली होती. १ फेब्रुवारी रोजी नागपूर दर दिवसाला सरासरी ५ रुग्णांचा कोरणामुळे मृत्यू व्हायचे, मात्र मार्च महिन्यात मृत्यूचे आकडे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. मार्च महिन्यात सरासरी ५० रूग्णांचे मृत्यू होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात १७१ लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाले होते तर मार्च महिन्यात मृत्यूचा आकडा ७५७वर गेलेला आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात ५८६ लोकांचे मृत्यू अधिक झाले आहेत. केवळ मृत्यू संख्येच्या बाबतीत मार्च महिना घातक ठरलेला नाही तर रुग्ण संख्येमध्येही मार्चमध्ये प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ८२५३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे तर ३१ मार्च रोजी हा आकडा ४० हजारांच्या घरात गेला आहे. याचाच अर्थ मार्च महिन्यात तब्बल ३२ हजार वाढीव रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडल्याची भीषण परिस्थिती नागपूरमध्ये उद्भवली आहे. रोज कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अजूनही कमी आल्यानेच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या येत्या काही दिवसातच ५० हजारांपर्यंत जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही मोठी घट
नागपूर जिल्ह्यात कोरोनाबधितांचे आकडे सुसाट वेगाने वाढत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९४.४८ इतकी होती तर २८ फेब्रुवारीला हा आकडा ९१.६० टक्के आहे. तर ३१ मार्च रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.३४ इतके झाले आहे.