नागपूर - उपराजधानीत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं दिलासादायी चित्र दिसत होतं. मात्र, गेल्या काही दिवसांत 'म्युकरमायकोसिस' या बुरशीजन्य आजाराचा प्रकोप जिल्ह्यात वाढताना दिसू लागला आहे. नागपुरात 17 मेपर्यंत म्युकरमायकोसिसने 7 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर नागपुरात शासकीय आणि खासगी अशा 27 विविध रुग्णालयात तब्बल 284 जणांना या बुरशीजन्य आजामुळे दाखल करण्यात आले आहे. हे शासकीय यंत्रणेकडून एकत्र केलेले आकडे आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीततून हे पुढे आले असून प्रत्यक्षात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या उपराचादरम्यान अनेक रुग्णांना आवश्यक असणारे एम्फोटेरेसीन डोस उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या कुटुंबियांची भटकंती सुरू आहे. यात रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि मधुमेहासारखे आजार असणारे रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराच्या विळख्यात अडकले आहे. नागपुरात आतापर्यंत अशा 284 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांपैकी 129 जणांवर नाक, कान, घशाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
दररोज आढळणारी रुग्णसंख्या पाहता यासाठी लागणाऱ्या औषधी, अन्य टॅबलेट आणि इंजेक्शनचा तुटवडा मात्र जाणवत आहे. परिणामी त्याचा काळाबाजार वाढला आहे. साधारण मागणीच्या तुलनेत आताच्या घडीला रुग्णसंख्या शेकडो पटीने मागणी वाढली आहे. मध्यंतरी नागपूर केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव हेतल ठक्कर यांनी ही मागणी 400 पटीने वाढली असल्याचा दावा केला होता. यात आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने मागणी अजून जास्त वाढण्याची भीती आहे.