महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मागील चार वर्षात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात २१४ लोकांचा मृत्यू

जंगली प्राण्यांचे मूळ अधिवास सुरक्षित राहावे या करिता राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वनविभागाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. मात्र, त्या योजनांची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत असल्याने कायम वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचं चित्र आहे.

wild animals attack
मागील चार वर्षात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात २१४ लोकांचा मृत्यू

By

Published : Feb 12, 2021, 8:21 PM IST

नागपूर - गेल्या दोन दशकामध्ये राज्यात सिमेंटचे जंगलच्याजंगल उभी राहत आहेत. परिणामी खऱ्या खऱ्या जंगलाची व्याप्ती कमी झाली आहे. त्यामुळेच जंगलातील हिंसक जनावरे शहराच्या दिशेने येत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वन्य प्राणी आणि माणसात संघर्ष सुरू असल्याच्या अनेक घटना घडत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. वनसंपदेने नटलेल्या महाराष्ट्राच्या जंगलात वाघांची संख्या फार मोठी आहे. त्याचबरोबर वाघांच्या अधिवासात मानवाची घुसखोरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल १०१ लोकांचा बळी वाघाने घेतल्याची नोंद वनविभागाकडे झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून मागावलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ वाघच नाही तर बिबट, हत्ती, अस्वल, जंगली डुक्कर, मगर आणि रानगव्याच्या हल्ल्यातसुद्धा अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे.

अभय कोलारकर - माहिती अधिकार कार्यकर्ते

जंगली प्राण्यांचे मूळ अधिवास सुरक्षित राहावे या करिता राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वनविभागाकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. मात्र, त्या योजनांची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत असल्याने कायम वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचं चित्र आहे. मानव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासाठीसुद्धा कागदावरच प्रयत्न होताना दिसतात. त्यामुळेच गेल्या चार वर्षात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल २१४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या यादीत वाघ जरी सर्वात आघाडीवर असले तरी बिबट आणि अस्वल देखील फार मागे नसल्याचे आकडे सांगतात

मागील चार वर्षात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात २१४ लोकांचा मृत्यू

चार वर्षांत वाघाने घेतला १०१ लोकांचा बळी

पूर्व विदर्भ निसर्गाच्या हिरवळीने नटलेला आहे. त्यामुळेच प्राण्यांचं सर्वात सुरक्षित अधिवास म्हणून या जंगलाकडे बघितलं जात. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्याचबरोबर या जंगलांमध्ये अनेक हिंसक प्राणी देखील वास्तव्यास आहेत. मात्र, गेल्या काही काळात मानवाची घुसखोरी या जंगलांमध्ये वाढल्याने गेल्या चार वर्षांत वाघाने १०१ लोकांचा जीव घेतला आहे. यामध्ये गेल्या वर्षी (२०२०) सर्वाधिक ३८ लोकांचा जीव वाघाच्या हल्ल्यात झाला आहे. तर २०१९ मध्ये वाघाने २४ लोकांना ठार केले होते. २०१८ मध्ये हा आकडा १५ इतका आहे तर २०१७ मध्ये वाघाच्या हल्ल्यात २४ लोकांनी आपला जीव गमावलेला आहे.

मागील चार वर्षात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात २१४ लोकांचा मृत्यू

चार वर्षात इतर प्राण्यांनी घेतला ११३ लोकांचा जीव

चार वर्षात वाघाने जरी १०१ लोकांचा बळी घेतलेला असला तरी बिबटने देखील ६५ लोकांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतलेला आहे. याशिवाय अस्वलनेसुद्धा १५ लोकांना मारल्याची नोंद वनविभागाकडे आहे. तर जंगली डुक्कर च्या हल्ल्यात १९ लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. एवढंच नाही तर हत्तीच्या हल्ल्यात सुद्धा दोंघांच्या मृत्यूची नोंद आहे. रानगव्याने सुद्धा ४ लोकांना ठार मारले असले तरी एकाचा मृत्यू मगरीच्या हल्ल्यात झाला असल्याची माहिती वनविभागाने उपलब्ध करून दिली आहे.

चार वर्षात २६ कोटींची मदत

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कुणाला जीव गमवावा लागला तर वनविभागाकडून मृतकाच्या नातेवाईकाला आर्थिक मदत दिली जाते. गेल्या काही काळात मदतीची रक्कम ८ लाखांपर्यंत झाली आहे. गेल्या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१४ लोकांचा बळी गेला असल्याने वनविभागाला मदतीपोटी २६ कोटी रुपयांची आर्थिक मदत मृतकांच्या नातेवाईकांना द्यावी लागली असल्याची माहिती देखील वनविभागाने उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा -रामोजी फिल्म सिटी १८ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी होणार खुली

हेही वाचा -संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

ABOUT THE AUTHOR

...view details