नागपूर - शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध फुटाळा तलावात एका वीस वर्षीय तरुणाने त्याच्या बाईकसह उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अथर्व आनंदेवार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मात्र, त्याने आत्महत्या करण्यामागील कारणांचा उलगडा होऊ शकलेले नाही. मात्र, घटना संशयास्पद वाटत असल्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
अथर्वने आज दुपारी बाराच्या सुमारास आपल्या काही मित्रांना, मी फुटाळा तलावात उडी घेत असल्याचे मेसेज केला असल्याची माहिती समोर आली आहे. अथर्वचा मेसेज मिळताच त्याच्या मित्रांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याने आपल्या दुचाकीसह तलावात उडी घेतली होती. अनेक तास प्रयत्न केल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अथर्व दुचाकी आणि त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. अथर्वने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अथर्व नागपूरच्या वाडी परिसरातला राहणारा होता.