नागपूर - शहर पोलीस दलात सेवा देत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धंतोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले 50 वर्षीय पोलीस शिपाई आणि पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले 54 वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.
नागपूरमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू - नागपूरमध्ये पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू बातमी
नागपूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून नागपूर पोलिस दलातील 25 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर पोलीस शिपाई यांना बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) संध्याकाळी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच त्यांचादेखील मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हापासून राज्यातील पोलीस रस्त्यांवर, गल्लीबोळात आणि प्रतिबंधित क्षेत्रात तैनात आहेत. हीच परिस्थिती उपराजधानी नागपुरातसुद्धा आहे. गेल्या पाच महिन्यात नागपुरातील सुमारे 25 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, गुरुवारी (दि. 6 ऑगस्ट) सकाळी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने पोलीस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.