नागपूर -पोलीस दलाच्या पुणे प्रशिक्षण केंद्रातून नागपूरला परत आलेल्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे 10 जणांना एकाच वेळी लागण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कोरोनाचा आलेख चढउतार होत असताना एकाच वेळी 10 पोलीस कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु करण्यात आले आहे. यामध्ये आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ट्रेनिंगवरून परल्यानंतर आढळले सौम्य लक्षणे -
नागपूर पोलीस दलातील सर्व 31 पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या गुप्त वार्ता विभागातील एक पोलीस कर्मचारी आणि विशेष शाखेतील 2 एकूण 33 पोलीस कर्मचारी पुणे येथील महाराष्ट्र गुप्तवार्ता अकादमी 10 दिवसांच्या ट्रेनिंग साठी गेले होते. हे सर्व कर्मचारी 30 ऑगस्टला पुण्याला गेले होते. आता ते 10 सप्टेंबरला ट्रेनिंग संपून परत आले. यात ट्रेनिंग आटोपल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताप आणि सर्दी खोकला यासारख्ये सौम्य लक्षणे जाणवल्याने पोलीस रुग्णालयातही डॉक्टरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना टेस्ट करण्याची सूचना दिली.