महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नायर रुग्णालयात लहान मुलांना ‘झायकॉडी’ लस, ट्रायलला लवकरच सुरुवात - झायकॉडी लस

मुंबईत कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. येत्या महिनाभरात तिसरी लाट येणार असून त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील लहान मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Zykodi vaccine for children
Zykodi vaccine for children

By

Published : Jul 12, 2021, 10:22 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. येत्या महिनाभरात तिसरी लाट येणार असून त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील लहान मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी १२ ते १८ वयोगटातील मुलांचे नायर रुग्णालयात ट्रायल लसीकरण केले जाणार आहे. ‘झायडस कॅडिला’ कंपनीने लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. या ‘ट्रायल’मध्ये ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे.

झायडस कॅडिलाची 'ट्रायल’ला तयारी -

मुंबईत कोरोनाचा प्रसार गेले दीड वर्ष आहे. या दरम्यान मुंबईत कोरोनाच्या दोन लाटा आल्या. दुसरी लाटही आता पूर्ण आटोक्यात आली आहे. असे असले तरी ऑगस्टमध्ये तिसरी लाट येणार असून यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने जम्बो कोविड सेंटरसह कोरोना केअर सेंटरमध्ये बेडची व्यवस्था करताना प्रत्येक ठिकाणी पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, पालिकेने लहान मुलांच्या लसीकरणासाठी महिनाभरापूर्वी ‘झायडस कॅडिला’ या लस उत्पादक कंपनीला पत्र दिले होते. याला या कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. झायडस कॅडिला कंपनीने लहान मुलांवरील लसीकरणाच्या ‘ट्रायल’ला तयारी दर्शवली आहे, अशी माहिती पालिकेचे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली. नायर रुग्णालयात पहिल्याच दिवशी दोन मुलांनी नोंदणीही केली आहे. मुलांनी लसीकरण ट्रायलसाठी पुढे यावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

लसीचे तीन डोस दिले जाणार -

सर्वसाधारणपणे पालिकेच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस १८ वर्षे वयोगटावरील नागरिकांना नोंदणीनुसार ८४ दिवसांनंतर दिला जात आहे. तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जातो. मात्र १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी, २८ व्या दिवशी आणि ५६ व्या दिवशी डोस दिला जाईल अशी माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली. लहान मुलांच्या लसीकरणासाठी नायरमध्ये प्रशिक्षित कर्मचार्‍यांसह आवश्यक सर्व यंत्रणा तैनात आहे. त्यामुळे मुलांची नोंदणी झाल्यानंतर तातडीने लसीकरणाची ट्रायल सुरू होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details