मुंबई - आर्टिकल 370 हटवल्यानंतर भाजपने समर्थन मिळवण्यासाठी केंद्रातील एका मोठ्या अधिकाऱ्याला चर्चेसाठी आपल्याला पाठवल्याचे झाकिर नाईक याने सांगितले आहे. संबंधित अधिकाऱ्याला गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियात बैठकीसाठी पाठवल्याचे तो म्हणाला. तसेच काश्मीरमधील 370 आर्टिकल हटवण्याच्या समर्थनात भाजपसोबत यावे, अशी 'ऑफर' या अधिकाऱ्याने दिल्याची माहिती झाकिर नाईकने दिली आहे.
झाकिर नाईक याने गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. काश्मीर मुद्द्यावर भारताला समर्थन दिल्यास माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेण्यात येतील, असे नाईकने सांगितले आहे. तसेच भारतात परतण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याकडून देण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे.
सध्या मलेशियात वास्तव्यास असलेल्या डॉ. झाकिर नाईक याने तब्बल पाच मिनिटांचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर प्रसारित केला आहे. यामध्ये त्याने नरेंद्र मोदींसह अमित शाह यांना लक्ष्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी देशभरातील काही मुस्लीम नेते भाजपसोबत असल्याचा खुलासा त्याने केला आहे. मात्र, या नेत्यांना ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे तो म्हणाला.
व्हिडिओमध्ये चिथावणीखोर भाषण करून दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना उकसवणाऱ्या इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर नाईकने या आधीही अशा प्रकारचे दावे केले होते. इंटरपोलच्या रेकॉर्डवरून त्याची माहिती वगळण्यात आल्याचे त्याने मागील व्हिडीओत सांगितले होते.