मुंबई - मुंबई या मायावी नगरीत आपली स्वप्न घेऊन ती पूर्ण करायला देशभरातून लाखो लोक येत असतात. पण सर्वांची स्वप्न पूर्ण होत नसतात. काहींच्या पदरी निराशा पडते तर काही चुकीच्या मार्गावर जातात. आणि विशेष करून मागच्या दोन वर्षात कोविड सारख्या महामारीने अनेकांची स्वप्न उध्वस्त झाली आहेत. छोटे-मोठे उद्योग बंद पडले आहेत. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत, अशा परिस्थितीत मनात जिद्ध व इच्छा शक्ती असेल तर माणूस काय करू शकतो हे दाखऊन दिले आहे. मुंबईतील अभ्युदयनगरचे युवा उद्योजक ३२ वर्षीय उदय अशोक पवार या तरुणाने. त्याने इस्त्री सारख्या व्यवसायाला कॉर्पोरेट लूक देण्याबरोबरच बेरोजगारांना रोजगार देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
इस्त्रीच्या कपड्यांना हाय प्रोफाईल टच -
घरात इस्त्री असूनही वेळ नाही म्हणून किंवा आळसामुळे आपण इस्त्री करायला तयार होत नाही. कितीही मेहनत घेतली तरी हवी तशी परीटपडी होत नाही आणि मग उगाचच मूड खराब होतो. नेहमीच्या इस्त्रीवाल्याकडे कपडे दिले, तर पाहिजे तेव्हा मिळत नाहीत किंवा आणायला आपल्याकडे वेळ नसतो. बऱ्याच वेळा जेव्हा वेळ मिळतो. तेव्हा हमखास दुकान बंद यामुळे प्रत्येक जण चिंतेत. दिवसाची सुरुवात खराब आणि जुना स्टॉक वापरल्याने दिवस खराब, इमेज खराब आणि हीच समस्या जाणून मुंबईतील काळाचौकी, अभ्युदयनगर येथील युवा उद्योजक उदय अशोक पवार यांनी खूप अभ्यास करून आयन फिल आयनिंग सर्व्हिस ही अनोखी आधुनिक आयनिंग सेवा ४ वर्षापूर्वी ग्राहकांसाठी सुरू केली आहे. आपला वेळ आणि पैसा वाचवणारी ही सेवा आपले रुटीनसुद्धा सुसह्य करत आहे. ह्या सेवेसोबत लॉन्ड्री सेवाही पुरवली जात आहे. कंपनीद्वारे कपडे धुऊन आकर्षकरीत्या पॅक करून देण्यात येतात. तेव्हा जणू शॉपिंग मॉलमधून कपडे गिफ्ट पॅक आणलेत असा फिल येतो, इतका प्रोफेशनल टच देण्यात येतो. त्यामुळे हायप्रोफाइल कस्टमर सातत्याने वाढत आहेत. आजच्या घडीला उदय पवार यांच्याकडे १२०० ग्राहक आहेत.
कपडे धुण्याची ही कल्पना आणि मनात -
चार वर्षापुर्वी एका टेबल द्वारे छोट्याशा दुकानात चालू केलेला व्यवसाय आजच्या घडीला फार मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण मुंबईमध्ये विस्तारला आहे. एक सामान्य इस्त्रीवाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायाला प्रसिद्धी देईल असं स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल. परंतु उदय पवार या तरुणाने इतर बेरोजगार व गरजवंत तरुणांना हाताशी घेत त्यांना काम दिले. आज मुंबईतील लालबाग, परेल, दादर, काळाचौकी, शिवडी, नायगाव, माटुंगा, भायखला या दक्षिण मुंबईतील ठिकाणी हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारला आहे. सुरवातीला इस्त्री करण्याबरोबर नंतर कपडे धुण्याची कल्पना ही उदय पवार यांच्या मनात आली. कपडे धुण्यासाठी मुंबईतील महत्त्वाची जागा म्हणजे धोबीघाट. परंतु आत्ताच्या काळात हात धोबीघाट सुद्धा नामशेष झालेला आहे. मुंबईत पूर्वी मोकळ्या जागेत, रेल्वे ट्रॅकच्या बाजूला, झोपडपट्ट्यांच्या शेजारी आपण खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे, हॉस्पिटलमधील स्टाफचे, रुग्णांना वापरण्यासाठी देण्यात येणारे कपडे वाळत घातलेली दृश्य पाहिली आहेत. परंतु ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छ असतात की ती त्याचा विचारच न केलेला बरा. त्या कारणाने एक नवीन विचार उदय पवार यांच्या मनात आला आणि म्हणूनच लोक वापरणारी कपडे हे सुद्धा तेवढेच नीटनेटके व टापटीप असावेत या कारणांनी त्यांनी स्वतःच्या मशिनरी विकत घेऊन त्यात कपडे धुण्यास सुरुवात केली. कपडे धुतल्यानंतर ते स्टीम प्रेस करण्यात येतात व त्याची परटघडी इतकी व्यवस्थित घातली जाते की ते कपडे वापरणाऱ्याला सुद्धा त्याचा आनंद भेटतो.