मुंबई - महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका युवकाचा डोळा उंदरांनी कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे पडसाद पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. खासगी संस्थेचे कंत्राट रद्द करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. तर ही घटना निंदनीय आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्यांना जाब विचारून असे प्रकार पुढे होऊ नयेत, यासाठी काय केले जाणार आहे याची माहिती पुढील बैठकीत सादर करण्यात यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
खासगी संस्थेचे कंत्राट रद्द करावे -
मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आयसीयूमध्ये बेशुद्ध अवस्थेत अॅडमिट असलेल्या एका २४ वर्षीय रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडले. हा प्रकार रुग्णाच्या नातेवाईकांनी ड्युटीवर असलेल्या नर्सना सांगितला असता त्यांना उद्धट उत्तरे देण्यात आली. या घटनेबाबत राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव हरकतीचा मुद्दा स्थायी समितीत उपस्थित करत चर्चा घडवून आणली. यावर बोलताना राजवाडी रुग्णालयात १० बेडचा आयसीयू क्रिटीकेअर या खासगी संस्थेला चालवण्यास दिला आहे. त्या आयसीयूची देखभाल करण्याचे काम त्या संस्थेचे आहे. उंदीर आत कसा आला हे पाहण्याची जबाबदारीही त्या संस्थेची आहे. खासगी संस्थांमुळे महापालिकेचे नाव खराब होत आहे. यामुळे खासगी संस्थांना दिलेल्या आयसीयू, एनएसआययू मध्ये त्यांनीच देखभाल करावी, असा नियम त्यांच्या करारामध्ये समाविष्ट करावा तसेच हलगर्जीपणा केल्याबाबत क्रिटीकेअर या खासगी संस्थेचे कंत्राट रद्द करावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.
राजावाडीत रुग्णाचे डोळे कुरतडले, खासगी संस्थेचे कंत्राट रद्द करण्याची मागणी.. ती घटना निंदनीय-
आरोग्य विभागासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात मोठया प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. आरोग्य विभागाचे नूतनीकरण, नवीनीकरण, दुरुस्त्या करत आहोत. अशावेळी जर अशा घटना घडत असतील तर त्याचा निषेध करायलाच पाहिजे. ज्या ठिकाणी कामे सूरु आहेत अशा ठिकाणी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. रुग्णालयात शेकडो हजारो कर्मचारी, डॉक्टर काम करतात. त्यांच्यासमोर असे प्रकार घडत असतील तर ती घटना निंदनीय आहे. प्रशासनाने असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेतली पाहिजे. कर्मचाऱ्यांना जाब विचारला पाहिजे तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय काळजी घेण्यात येणार आहे याची माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
उंदराने रुग्णाचा डोळा कुरतडला -
श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते. त्याला मेंदूज्वर झाला होता आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले होते. या रुग्णाला पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले होते. त्याच्या नातेवाईकांनी या रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडले असल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. हा प्रकार समोर येताच डोळ्यांच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी केली असता डोळ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झलेली नाही. मात्र त्या रुग्णाच्या पापण्याखाली उंदराने कुरतडल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार गंभीर आहे. तो आयसीयू तळ मजल्यावर असला तरी सर्व बाजूने बंद आहे. पावसाळा असल्याने दरवाजामधून तो उंदीर आत गेला असावा. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती महापौरांनी दिली.