मुंबई- एनआरसी आणि सीएए कायद्याला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी(दि. 29 जानेवारी) भारतीय मुक्ती मोर्चाने या कायद्याला विरोध म्हणून बंदची हाक दिली होती. या बंदला काही मुस्लीम संघटनांनी देखील प्रतिसाद दिला.
मुंबईत बंदचा फारसा परिणाम दिसत नसला तरी मुस्लीम बहुल भेंडी बाजार, नळ बाजार, मनीष मार्केट, भायखळा या भागात कडकडीत बंद दिसून आला. मुंबईत व्यवहार सुररळीतपणे सुरू आहेत. सकाळी भारतीय मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर रुळावर उतरुन लोकल रेल्वे अडवली होती. त्यावेळी आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी लोकल रोखून धरली होती. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रुळावरुन हटवले होते. त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली होती.