मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्रे मोदींना भेटल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर पूर्णविराम टाकण्यासाठी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असून मोदींसोबतच्या बैठकीत सहकारी बँकांच्या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या भेटीविषयी विरोधी पक्ष चूकीच्या वावड्या उठवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदींसोबत सहकार, लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. त्यानुसार पवार साहेबांची पंतप्रधानांसोबत भेट झाली. यात सहकारी बँकेच्या प्रणालीत केलेल्या बदलांविषयी चर्चा झाली. सहकारी बँका राज्याच्या कायद्यानुसार तयार केल्या जातात. मात्र ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी RBI त्यावर देखरेख ठेवते. तसेच आजच्या कायद्यात शेअर होल्डर आपले शेअर विकू शकत नाही. मात्र नवीन नियमांनुसार शेअर विकले जाऊ शकतात. त्यामुळे काही लोकांचे बँकेवर नियंत्रण येऊ शकते, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे मलिक यांनी पत्रकारांना सांगितले. याशिवाय लसींच्या पुरवठ्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्ष चुकीच्या वावड्या उठवत आहे
या बैठकीनंतर विरोधी पक्ष चुकीच्या ववड्या उठवत आहेत. या बैठकीबाबत काँग्रेस नेत्यांना माहिती देण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनाही या भेटीबद्दल कल्पना देण्यात आलेली होती. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात कोणतीही बैठक झालेली नाही असेही मलिक यांनी स्पष्ट केले.