मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी मुंबईत नवीन चार जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहेत. त्यानुसार चुनाभट्टी येथील सोमैया मैदानात म्हाडाकडून कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. हे सेंटर बांधण्यासाठी म्हाडाकडून मागवण्यात आलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार आता निविदा अंतिम करत कंत्राट देण्यात येणार आहे. तर पुढील आठवड्यात सेंटरच्या बांधणीला सुरुवात होईल, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अभियंता सुनील जाधव यांनी दिली. तसेच काम सुरु झाल्यापासून दीड ते दोन महिन्यात काम पूर्ण करत, ते मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
म्हणून नवीन कोविड सेंटरची उभारणी -
कोरोनाच्या पहिल्या लाटेत मनुष्यबळ आणि आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडल्या. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी मुंबईत ट्रान्झिट हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगर पालिकेने बीकेसीत पहिले कोविड सेंटर उभारले. त्यानंतर टप्प्याटप्प्यात वरळी, नेस्को, दहिसर, मुलुंड येथे ही जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली. या सेंटरचा मोठा फायदा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत झाला. पण दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत खूपच वाढली. बेडस, ऑक्सिजन कमी पडू लागली. अशात आता सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांनी जाहीर केले आहे. तेव्हा तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत आणखी काही कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मालाड येथे 2200 बेडसचे कोविड सेंटर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) कडून, तर कांजूरमार्ग येथे 2000 बेडसचे कोविड सेंटर सिडकोकडून बांधण्यात येत आहे. त्याचवेळी सोमैया मैदानावरील कोविड सेंटरच्या उभारणीची जबाबदारी म्हाडाला देण्यात आली आहे.