मुंबई - लॉकडाऊन सुरू असल्यापासून सर्व आयटी कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहे.
'पॉवर ग्रीड फेल्युअर'मुळे आज सकाळपासूनमुंबईत सर्वत्र वीजपुरवठा खंडित झाला. मुंबई तसेच संपूर्ण उपनगराला याचा फटका बसला आहे. यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. मुंबईतील मुख्य कार्यरत असणारी क्षेत्र यामुळे ठप्प झाली. रेल्वे, सरकारी कार्यालयं, बँका, एटीएम यांचे व्यवहार थांबले. मात्र याचा सर्वाधिक फटका वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसू शकतो.
राज्यातील सर्वात जास्त मल्टिनॅशनल कंपन्या मुंबईत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राचा विकास मुंबईसह उपनगरात झाला आहे. यातील 90 टक्के कर्मचारी वर्ग घरातून काम करत आहे. अशा वेळी डेटाबेस प्रोव्हायडर्स तसेच त्यावर काम करणारे वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो.
माहिती, अर्थ, बँकिंग क्षेत्राचं मोठे जाळे मुंबईत आहे. टाटा, टेक महिंद्रा, अॅक्सेंचर, कॅपजेमीनी यांसारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांकडे देशभरातील 40 टक्के डेटा सेंटर्स आहेत. देशभरातील मोठे डेटा सेंटर्स मुंबई आणि नवी मुंबईच्या दरम्यान स्थित आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, वीजपुरवठा खंडित झाल्याने देशभरातील 1200 टेलिकॉम टॉवर्सला त्याचा फटका बसणार आहे. स्टॉक एक्सेंजमधील सर्व व्यवहार मात्र सुरळीत चालू राहणार असल्याचे वृत्त आहे. निसर्ग वादळाच्या धोक्यावेळी सर्व विद्युत पुरवठा यंत्रणांनी 48 तास पुरेल एवढ्या बॅकअपची तयारी केली होती. मात्र, शहरातील डेटाबेस वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो.