मुंबई - साकीनाकामध्ये (Sakinaka Crime) मागील वर्षी एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असतानाच खूनाची अजून एक घटना येथे घडली आहे. पुरुषाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या महिलेचा खून केला आहे. मनीषा जाधव असे या महिलेचे नाव असून, याप्रकरणी आरोपी राजू नाले याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.
- दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय -
आरोपी नालेने त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मनीषावर अनेक वार केले. त्यानंतर ती जबर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. मनीषाचा खून केल्यानंतर आरोपी नाले पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, साकीनाका पोलिसांनी वेळीच त्याला पकडले आणि अटक केली. मनीषाचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध आहेत असा संशय आरोपी नालेला होता. मागील तीन वर्षांपासून ते दोघे एकत्र राहत होते. दोघांचेही लिव्ह इन रिलेशनशिपच्या आधी दोन वेळा लग्न झाले होते. आधीच्या पार्टनरसोबत घटस्फोट न घेताच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे सुरू केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.