मुंबई - शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान अंधेरी पश्चिम परिसरात एका ठिकाणी 'मॅन होल'मध्ये एक महिला पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर 'व्हायरल' होत आहे. ती महिला पडली तो मॅनहोल नसून 'केबल डक्ट' आहे. मेट्रोच्या देखरेखीखाली हे डक्ट असले तरी पालिकेने त्याठिकाणी झाकण लावून डक्ट बंदिस्त केला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मॅनहोल नव्हे 'केबल डक्ट' -
अंधेरी पश्चिम परिसरात एका ठिकाणी 'मॅन होल'मध्ये एक महिला पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर 'व्हायरल' होत आहे. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी कळविले आहे की, सदर घटना ही 'अंधेरी गोरेगाव लिंक रोड' नजीक आणि डी. एन. नगर मेट्रो स्टेशन जवळील एका ठिकाणी घडलेली आहे.
सदर ठिकाणी 'मेट्रो २ ए' प्रकल्पाची कामे सुरू असून त्यामुळे सदर जागा ही 'मेट्रो २ ए' प्रकल्पाच्या परिरक्षणाखाली आहे. त्या ठिकाणी उपयोगितांचे एक 'केबल डक्ट' आहे. तसेच सदर ठिकाणी कोणतेही 'मॅन होल' नाही. तसेच सदर ठिकाणी युटिलिटी डक्टच्या झाकणाच्या शेजारी ज्या दोन बांबू सारख्या बाबी दिसत आहेत त्या बांबू नसून 'केबल' वरील आवरण आहे, असे मोटे यांनी कळविले आहे.
झाकण बसविले -
'मेट्रो २ ए' प्रकल्पाच्या परिरक्षणाखालील जागेत असणा-या युटिलिटीच्या डक्टचे झाकण हे काही असामाजिक तत्त्वांद्वारे हटविण्यात आल्याचे बृहन्मुंबई महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागाद्वारे केलेल्या पाहणी दरम्यान आढळून आले. सदर जागा ही 'मेट्रो २ ए' प्रकल्पाच्या परिरक्षणाखाली असली तरीही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 'के पश्चिम' विभागाद्वारे सदर ठिकाणी तात्काळ झाकण बसविण्यात आले आहे, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त मोटे यांनी दिली आहे.