मुंबई - येणारे हिवाळी अधिवेशन हे मुंबईत होणार आहे. 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज विधिमंडळ कामकाज समिती बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपुरला घेण्यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहेत.
हेही वाचा -भाजप मित्रपक्षांना संपवतो, बिहारमध्येही हेच दिसतेय -छगन भुजबळ
विधिमंडळ कामकाज समितीची बैठक
या बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आयोजित करण्यात येते, पण सध्या राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ७ डिसेंबरला अधिवेशन घेता येईल का? आणि किती दिवस घ्यायचे याबाबतही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील कामकाज सल्लागार समितीची पुन्हा होणार बैठक
कोरोना संक्रमणाच्या धोक्यामुळे हिवाळी अधिवेशनावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनीदेखील याचा विरोध केला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली असली तरी, अधिवेशन मुंबईत होण्याचे संकेत आहेत. अधिवेशन कुठे घ्यावे आणि इतर संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार कामकाज सल्लागार समितीला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता कमी दिवसाचे अधिवेशन घेता येईल. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्रास होईल. नागपुरात कमी दिवसाचे अधिवेशन घेण्याऐवजी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन घेऊ शकते, अशी भूमिका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली होती.
हेही वाचा -बिहार निवडणूक : मुख्यमंत्री कोण हे पाहणे मनोरंजक होणार - राजकीय विश्लेषक उदय तानपाठक