मुंबई - सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीस ( Wine Sale In Supermarket ) परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आल्यानंतर आता या निर्णयाबद्दल विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला ( BJP Opposes Wine At Supermarket ) आहे. तर दुसरीकडे तरुण वर्गामध्ये या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत.
दारू सम्राटासाठी अर्थपूर्ण व्यवहार!
राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाईन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपरमार्केटमध्ये सुद्धा वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाचा भाजपने कडाडून विरोध केला आहे. हा निर्णय म्हणजे निर्लजपणाचा कळस असून, सत्तेची धुंदी व झिंग या सरकारला चढली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दारूविषयी सरकारला इतकं प्रेम आहे तर, शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक कशाला ठेवता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे. सध्या शेतकरी अवकाळी पाऊस, दुष्काळ, कोरोना महामारी या कारणाने त्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशात खासदार संजय राऊत यांनी सांगावे की, त्यांनी शेतकऱ्यांना किती पैसे दिले. कोविडमध्ये इतर राज्यांनी शेतकऱ्यांना मदत केली. पण महाराष्ट्राने शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. शेतकऱ्यांचे प्रेम हे पुतना- मावशीचे प्रेम आहे, असेही दरेकर म्हणाले. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी म्हणजे दारू सम्राटांसाठी अर्थपूर्ण व्यवहार करून केलेली ही गोष्ट आहे. दारू निर्मिती करणारे व दारू विक्री करणारे यांच्यासाठी घेतलेला हा निर्णय असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे. मुंबईतील ज्या स्टॉलमध्ये दारू विकली जाईल ती स्टॉल शेतकऱ्यांच्या मुलांना देणार का? शेतकऱ्यांच्या भलाईसाठी हा एकमेव मार्ग आहे का? असाही सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.