मुंबई -शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानाची घोषणा ( CM Thackeray on Shiv Sampark Abhiyan ) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना संबोधित करताना लवकरच आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा समाचार यावेळी मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला.
केवळ राजकारण करायचे असेल, तेव्हा भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा समोर काढते. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्तीसोबत भारतीय जनता पक्ष गेला असल्याची आठवणही यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तसेच, सरकारचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. भारतीय जनता पक्षाची कट-कारस्थाने ओळखायला शिका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केल्या.
22 ते 25 मार्च "शिव संपर्क अभियान" शिवसेनेकडून राबवला जाणार आहे. यावेळी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येणार असून, या अभियानासोबत शिवसेनेच्या प्रत्येक खासदार, जिल्हा प्रमुखांनी गावागावात जाऊन पक्षाची बांधणी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.