मुंबई - मराठवाड्यात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. खरीपाचे पीक वाया गेले आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यात जवळपास हीच परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कसे जगायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मातोश्री'तून बाहेर पडून मराठवाड्यात येणार का? असा सवाल भाजपाने केला आहे.
शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री 'मातोश्री'च्या बाहेर पडणार का?, भाजपाचा सवाल
मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला असतानाही मुख्यमंत्री 'मातोश्री' सोडायला तयार नाहीत. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका भाजपाने केली आहे.
उस्मानाबाद तसेच इतर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. खरेतर, संकटात सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी मायबाप म्हणून सरकार असते. मात्र विद्यमान महाआघाडी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी कुठल्याही प्रकारच्या संवेदना नसून, हे सरकार सापशिडीच्या खेळात गुंतले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुंबई सोडायला तयार नाहीत. त्यांनी मराठवाड्यात पाय ठेवून बळीराजाचे सुरू असलेले हाल बघावेत. मात्र मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर निघायला तयार नाहीत. मुख्यमंत्रीच काय, पालकमंत्री सुद्धा अद्याप शेतकऱ्यांकडे फिरकले नाहीत. हे राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.