मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस जाहीर करण्यात आला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी जास्त बोनस जाहीर केल्याने लाखो पालिका आणि हजारो बेस्ट कर्मचारी खुश झाले आहेत. याचा फायदा येत्या निवडणुकीत पालिकेतील सत्ताधारी व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेला तसेच महाविकास आघाडीला होणार आहे.
- 20 हजार रुपये बोनसचा निर्णय -
कोरोना विषाणूच्या काळात मुंबई महापालिका आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. याची दखल घेत यावर्षी बोनस वाढवून द्यावा अशी मागणी कामगार संघटनांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. त्यानंतर पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना 2023 - 24 पर्यंत दरवर्षी प्रत्येकी 20 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे स्वागत कामगार संघटनांनी केले आहे. कामगार संघटनांनी याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यांना दिले आहे.
हेही वाचा -मुंबई : पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 20 हजार रुपये बोनस जाहीर
- शिवसेना आणि आघाडीला फायदा -
मुंबई महापालिकेत सध्या विविध विभागात 95 लाख कर्मचारी काम करत आहेत. शाळांमध्ये 10 हजार शिक्षक काम करतात. तर बेस्टमध्ये सुमारे 36 हजार कर्मचारी काम करतात. हे सर्व कर्मचारी बोनस दिल्याने सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर खुश झाले आहेत. पालिकेचे आणि शिक्षण विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या कामाला असतात. बोनसची रक्कम वाढवून दिल्याने कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटूंबीयांची मते सत्ताधारी शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला मिळणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक सुनिल शिंदे यांनी दिली.
- पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये भरघोस वाढ -