मुंबई- देशभरात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन या वर्षांच्या अखेरपर्यंत आयआयटी मुंबईत वर्गातील प्रत्यक्ष शिकवण्या होणार नाहीत, असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीची माहिती आयआयटी मुंबईचे संचालक सुभाशिष चौधरी यांनी सोशल माध्यमावर एक पोस्ट शेअर करुन दिली आहे.
देशात आणि मुंबईतही कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यामुळेच अशा प्रकारे आम्ही वर्षे अखेरपर्यंत एकही वर्ग आणि त्यातील शिकवण्या प्रत्यक्षात घेणार नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आयआयटी मुंबईतील शैक्षणिक वर्षाची सुरूवात ही आपल्या नियोजित वेळेतच होणार आहे. मात्र मागील ६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक वर्षांची सुरूवात आहे.
नवीन प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आयआयटीने नियोजन केले आहे. ऑनलाईन आणि त्यातील व्हर्च्युअल क्लास आदींचे शिक्षण घेताना कोणताही विद्यार्थी मागे राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. यासाठीच आयआयटीमधील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप, डेटाप्लॅन मिळवून देण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी माजी विद्यार्थी आणि इतरांना संचालक चौधरी यांनी भावनिक आवाहन केले आहे
यासाठी https://acr.iitb.ac.in/donation/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन देणगी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तर माजी विद्यार्थ्यांनी यासाठी लागणारा निधी जमा करण्याचे आश्वासन आपल्याला दिले असल्याची माहितीही चौधरी यांनी दिली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आयआयटीमधील सर्व शाखांचा अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार आहे. त्यासाठीची माहिती विद्यार्थ्यांना पोहोचवली जाणार आहे.
शैक्षणिक वर्षे नियमित वेळेत सुरू होईल....