मुंबई : पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणामुळे वादात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत चालला आहे. पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीमुळे विरोधकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राठोड यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच संजय राठोड यांचा राजीनामा घेतील अशी दाट शक्यता असल्याचे मत व्यक्त होताना दिसत आहे.
मुख्यमंत्री घेणार संजय राठोड यांचा राजीनामा? - sanjay rathore
पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीमुळे विरोधकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राठोड यांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच संजय राठोड यांचा राजीनामा घेतील अशी दाट शक्यता असल्याचे मत व्यक्त होताना दिसत आहे.
विरोधकांकडून सातत्याने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भात अधिकृतरित्या काहीही वक्तव्य करण्यात आलेले नाही. पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. मात्र पोलिसांवरही राज्य सरकारकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री या प्रकरणी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही नाराजी
पंधरा दिवस अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे दर्शनाला आल्यानंतर तिथे मोठी गर्दी उसळल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत याविषयी नाराजी व्यक्त केली. सरकारमधील मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासत असतील, तर सामान्य जनतेत काय संदेश जाईल? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे समजत आहे.
स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नाराज
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला नियमांच्या काटेकोर पालनाचे आवाहन केले आहे. मात्र वनमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे गेल्यानंतर मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे या प्रकारावर मुख्यमंत्रीही नाराज आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमावलींचे उल्लंघन आणि विरोधकांचा वाढता दबाव या कारणांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा घेतील असे बोलले जात आहे.
संजय राठोडांमुळे सरकारच्या प्रतिमेला तडा
पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणात विरोधक सातत्याने वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला या प्रकरणामुळे मोठा धक्का बसल्याचे मत विश्लेषकांमधून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता सरकार हे प्रकरण कसे हाताळते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.