मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या संपत्तीचा लिलाव मुंबईतील सफेमा कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने मंगळवारी पार पडला. दाऊद इब्राहिम याच्या 7 संपत्तीपैकी 6 संपत्तीचा लिलाव पूर्ण झालेला असून एका संपत्तीला लिलाव प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले होते.
दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी येथील असलेल्या वडिलोपार्जित घराला 11 लाख 20 हजाराची बोली लावून विकत घेतलेले आहे .
या अगोदरही विकत घेतली होती दाऊदची संपत्ती -
याबरोबर दाऊद इब्राहिमच्या काही गुंठे जागा सुद्धा अजय श्रीवास्तव यांनी विकत घेतलेली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना अजय श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे की, या अगोदरही 2001 मध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमच्या संदर्भातील एक संपत्ती विकत घेतली होती . ज्याला दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिने विरोध दर्शवला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून हसीना पारकर यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी आपल्याला न्याय मिळून विकत घेतलेली संपत्ती ही आपल्या ताब्यात येईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
सनातन कार्यासाठी शाळा सुरू करणार -
तूर्तास दाऊद इब्राहिमच्या नावावर असलेल्या दोन संपत्ती आपण विकत घेतलेल्या असून या दोन्ही संपत्तीच्या जागेवर सनातन कार्यासाठी आपण शाळा उघडणार असल्याचं अजय श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे. देशात आणखीन इतर बरेच जण आहेत ज्यांना दाऊद इब्राहिमच्या संपत्तीच्या बोली प्रक्रियेत भाग घेता येईल. त्यांनी समोर येऊन दाऊद इब्राहिमची संपत्ती विकत घेऊन देश कार्यात द्यावी, असे अजय श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.