मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने त्यांचा चार्ज आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदावर अमृता फडणवीस यांची नियुक्ती करणार का? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. भाजपकडून महिलांचे हनन होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही महापौरांनी दिला आहे.
प्रतिक्रिया देताना महापौर किशोरी पेडणेकर हेही वाचा -Fact Check : राणीबागेचे नाव बदलल्याच्या अफवाच!
पाटलांना महापौरांचे उत्तर -
राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. मुख्यमंत्र्यांना लक्ष करत ४५ दिवसांपासून मुख्यमंत्री राज्यात सक्रिय नाहीत. त्यामुळे, त्यांचा चार्ज आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. या टीकेला उत्तर देताना पाटील यांच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही. पण, ते काहीही टीका करत आहेत. यामुळे उत्तर द्यावे लागते. रश्मी ठाकरे या कधीच लाईमलाइटमध्ये राहिल्या नाहीत. तरीही त्यांचे नाव घेतले जात आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांची कीव करावी वाटते. रश्मी ठाकरे याच्यापेक्षा अमृता फडणवीस या लाइमलाईटमध्ये जास्त असतात. त्यामुळे, भाजपा त्यांना विरोधी पक्ष नेते बनवणार का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. भाजपकडून महिलांचे हनन केले जात आहे. महिलांचे हनन केले जात असल्याने त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील -
मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. ४५ दिवसांपासून मुख्यमंत्री राज्यात सक्रीय नाहीत, त्याचबरोबर राज्याचा डोलारा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. आमचा आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचे नाही ठरवले तरी सुद्धा राज्यपालांशिवाय काहीही करता येत नाही. मुख्यमंत्र्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांवरील अविश्वास स्वाभाविकच आहे. त्यांना जर पक्षातही कोणावर विश्वास नसेल, तर आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले. त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल तर, रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या.
हेही वाचा -Suspended MLA Letter : निलंबनाचा कालावधी कमी करावा, बारा आमदारांचे विधानसभा उपाध्यक्षांना विनंती पत्र