मुंबई- स्वत:च्या पत्नीवर आपल्या 3 मित्रांकडून बलात्कार करवणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेला 46 वर्षीय आरोपी प्रतिष्ठित उद्योजक आहे.
आरोपीच्या पत्नीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पतीने त्याच्या मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थपित करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. 2017 पासून हा प्रकार सतत घडत होता.
पतीने त्याच्या तीन मित्रांकडून आपल्यावर सतत बलात्कार करवला होता. तसेच यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
समतानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उद्योजक व पीडित महिलेला दोन लहान मुले आहेत. घटस्फोट मिळण्यासाठी पीडितेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच मुलांचा ताबा मिळावा यासाठी संबंधित महिला प्रयत्नशील आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर समतानगर पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने संबंधित आरोपीला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
पीडित महिलेच्या आरोपानुसार, तिच्या पतीने 3 मित्रांसोबत मिळून 'वाईफ स्वॅपिंग' अनेक वेळा केले होते. या बद्दल कोणाकडेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पीडितेने सांगितले. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.