मुंबई - मायानगरीत दर पावसाळ्यात किमान एकदा तरी मुंबईची तुंबई होते, पण अशी स्थिती का निर्माण होते, शहराचं नुकसान का होतं? याचा विचार करणे गरजेचे आहे. 'पुर्वेकडचं लंडन' अशी ख्याती असलेल्या या शहराची अवस्था वर्षागणिक बिकट होत चाललेली दिसते. या परिस्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत. याच घटकांचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट.
- सात बेटे एकमेकांना जोडून तयार केलेलं शहर, ही मुंबईची ऐतिहासिक ओळख आहे. पण या सात बेटांवर एकूण 22 टेकड्याही होत्या. दोन बाजूंना खाड्या आणि समुद्र आणि मध्ये 22 छोट्या मोठ्या टेकड्या यामुळे मुंबईची भौगोलिक परिस्थिती पूर येण्यासाठी अनुकूल आहे.
- मुंबईतील बराचसा भाग हा खाडीत भराव टाकून बनवलेला आहे. भरावाचा भाग सखल प्रदेशातच असल्याने तिथे पाणी तुंबते. सायन चुनाभट्टी, दादर पश्चिम आणि मुंबईतली अनेक ठिकाणे ही भराव टाकून अस्तित्वात आली आहेत. यातले काही भाग भरावानंतरही सखल आहेत. यामुळे तिथे दरवर्षी पाणी तुंबते.
- मुंबई तीन बाजूंनी समुद्राने वेढलेली आहे. समुद्र आणि खाडी ते जमीन यांच्यामध्ये दलदलीच्या प्रदेशात असलेल्या खारफुटी जंगलांमुळे मुंबईचा किनारा सुरक्षित राहतो. खारफुटीचे जंगल समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करते आणि जमिनीवर पाणी पसरू देत नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईला पडलेल्या बेकायदेशीर झोपड्यांच्या आणि काही इमारतींच्याही विळख्यामुळे ही खारफुटीची जंगलं आणि मिठागरे नष्ट होत चालल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
- काही वर्षांपुर्वीपर्यंत मुंबईचे क्षेत्रफळ साडेचारशे चौरस किमीच्या आसपास होते. आता हेच क्षेत्रफळ 603 चौरस किलोमीटर एवढे पसरले आहे. ही वाढ भराव टाकून झाली आहे, ही वाढ करताना रस्ते, मलनि:सारण, पाण्याचा निचरा या गोष्टींचा काहीच नियोजनबद्ध विचार झाला नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या पॅटर्नमध्ये मागील काही वर्षात झालेला बदल -
खूप कमी वेळात खूप जास्त पाऊस पडल्याने पाणी साचते. तसेच भरती-ओहोटी या गोष्टींचाही प्रभाव पडतो. मुसळधार पाऊस असताना चार मीटरच्या वर भरती असेल, तर मुंबईच्या सखल भागांमध्ये हमखास पाणी तुंबते.