हैदराबाद -यंदा 2 नोव्हेंबरपासून म्हणजेच धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. याच दिवशी भगवान धनवंतरी यांनी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला वैद्यकीय शास्त्राचा प्रसार करण्यासाठी अवतार घेतला होता, म्हणूनच हा सण 'धनत्रयोदशी' म्हणून ओळखला जातो.
दागिने आणि भांड्यांची करतात खरेदी -
भगवान धनवंतरी हे विष्णूचे रूप मानले जाते. भगवान धनवंतरी हे वैद्यकीय शास्त्राचे प्रमुख देवता आहेत. तसेच दिवाळीची सुरुवात याच दिवसापासून होते. त्यामुळे हा दिवस धुमधडाक्यात साजरा करतात. या दिवशी दागिने आणि भांड्यांची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धनवंतरी आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच देवतांचे खजिनदार कुबेर यांचीही पूजा केली जाते. दिवाळीच्या पूजेसाठी या दिवशी लक्ष्मी-गणेशाची मूर्तीही घरात आणतात.
भगवान धनवंतरीच्या पूजेचे महत्त्व-
शास्त्रानुसार भगवान धनवंतरी त्रयोदशीला समुद्रमंथनाच्या वेळी प्रकट झाले होते म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात. ऐश्वर्य आणि वैभव देणारी ही त्रयोदशी विशेष महत्त्वाची मानली जाते. महासागरमंथनाच्या वेळी अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंव्यतिरिक्त शरद पौर्णिमेचा चंद्र, कार्तिक द्वादशीला कामधेनू गाय, त्रयोदशीला धन्वंतरी आणि कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला भगवती लक्ष्मी समुद्रातून अवतरली होती, असे म्हणतात. यामुळेच दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्रयोदशीच्या दोन दिवस आधी भगवान धनवंतरीचा जन्मदिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो.