मुंबई -भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना घरी जाऊन स्वयंपाक करा अशा शब्दात टीका केली तर त्या पाठोपाठ किरीट सोमय्या यांनीही उद्धव ठाकरे लुच्चा मुख्यमंत्री असल्याचे विधान केले आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारणात अलीकडे वापरल्या जाणाऱ्या शिवराळ भाषेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात गेल्या काही वर्षांपासून विशेषता भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसल्यानंतर शिवराळ भाषा अधिकाधिक वापरली जाऊ लागली आहे. वास्तविक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचीच भाषा अलीकडे घसरल्याचे दिसत आहे.
कोणा कोणाची घसरली भाषा? -शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिवराळ भाषा वापरल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून संसदीय भाषेचा वापर केला गेला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवीचा वापर केला. अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून गलिच्छ भाषेचा वापर केल्याचे दिसून आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमैया यांनीही अनेकदा पातळी सोडून वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. वास्तविक जनमानसामध्ये वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी भाषेचे भान बाळगायला हवे कारण त्याचा दुरगामी परिणाम समाजमनावर होत असतो.
गुंडांना लाजवणारी भाषा - भावसार
महाराष्ट्रात 1990 च्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती राजकारणात अनेक तत्कालीन गुंडांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता पांढऱ्या कपड्यातील नेत्यांच्या तोंडची भाषा पाहिली तर ती गुंडांनाही लाजवेल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे. राजकारण्यांनी समाजात वावरताना आपल्या भाषेचा पोत आणि लोकशाहीचे संकेत बाळगले पाहिजेत. आपण ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो त्यांच्यापुढे आपण काय आदर्श ठेवतो हे महत्त्वाचे आहे असेही भावसार म्हणाले.