महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी? नारायण राणेंसह, अजून कोणाच्या नावाची चर्चा? - नारायण राणे

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशन आगोदर करण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले आणि भारती पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Union Cabinet expansion
Union Cabinet expansion

By

Published : Jun 15, 2021, 3:02 PM IST

Updated : Jun 15, 2021, 4:02 PM IST

मुंबई -केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशन आगोदर करण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातून नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले आणि भारती पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशना आधी करण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. देशांमध्ये असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हा थांबवण्यात आला होता. मात्र आता पावसाळी अधिवेशना आधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून नेमकी या केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळचा विस्तारात भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचं नाव सध्या अग्रस्थानी असल्याचे मानले जातंय. यावेळी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नारायण राणे यांना सामावून घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या संदर्भात नारायण राणे हे लवकरच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांच्या सोबतच महाराष्ट्रातून प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले आणि भारती पवार यांच्या नावाची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वेळच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून दोन चेहरे देण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून ते दोन नवे मंत्री कोण याची चर्चा रंगू लागली आहे. राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांच्या मते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातून नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

नारायण राणे यांचे नाव अग्रस्थानी -

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचे राज्य राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचं नाव अग्रस्थानी असल्याचं सांगण्यात येतेय. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिल्याने भाजपाची ताकत कोकणामध्ये वाढेल अशी आशा केंद्रीय नेत्यांना आहे. यासोबतच नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. यासोबतच त्यांनी बराच काळ शिवसेनेसोबत कामही केल आहे. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आहे. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना जेरीस आणण्यासाठी भाजप नारायण राणे यांचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करू शकते. यासोबतच पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याचं काम नारायण राणे करू शकतात असा विश्वास केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी झाला तर, नारायण राणे यांचं मंत्रीपद शर्यती मधेले पारडे जड होईल. भाजपाचे महाराष्ट्रामधील नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. यांच्या सोबतही नारायण राणे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे देखील नारायण राणे यांच्यासाठी केंद्रात शब्द टाकू शकतील अशी आशा आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांची यांच्या नावाची नेहमीच चर्चा राहिली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचे नाव दिल्ली दरबारी सुचवले तर त्यांच्या नावाची राज्यांमध्ये होणारी चर्चादेखील थांबेल. त्यामुळेदेखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नारायण राणे यांचं नाव सुचवलं जाऊ शकते.

प्रीतम मुंडे यांच्याही नावाचा विचार -

मुंडे कुटुंबियांचा राज्यसह मराठवाड्यामध्ये मोठा प्रभाव आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांच्याकडे केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी दिली. तर, भविष्यात मराठवाड्यात भाजपला त्याचा फायदा होईल. तसेच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राज्यात असलेला वाद सर्वश्रुत आहे. अशावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी दिल्यानं हा वाद देखील शमण्याची शक्यता असल्याने प्रीतम मुंडे यांच्या नावाचा विचार मंत्रिमंडळ विस्तारामध्ये केला जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रीतम मुंडे यांच्याकडे राज्यातील ओबीसी नेते म्हणून देखील पाहिले जाते. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भाजपाच्या मागे राज्यातील मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज उभा राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

उदयनराजे यांच्या नावाची जोरदार चर्चा -

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या देखील नावाची चर्चा आहे. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर झाला आहे. यातच मराठा आरक्षण राज्य सरकारच्या चुकीमुळे गेले असल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने केला जातोय. त्यामुळे मराठा समाजाचे नेतृत्व असलेले उदयनराजे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेतल्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात मराठा समाज पुन्हा एकदा भाजपाच्या मागे उभा राहील. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात जागा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासदार भारती पवार यांचीही लागू शकते वर्णी -

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार भारती पवार यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात तरुणांना संधी देण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विचार आहे. तसेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे उच्चशिक्षित असणाऱ्या भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले तर उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपला मुसंडी मारता येऊ शकेल. त्यामुळे भारती पवार यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सामावून घेतलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Last Updated : Jun 15, 2021, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details