मुंबई : पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पेगासस हेरगिरीसाठी अब्जावधी रुपये कुणाच्या खिशातून गेले याचा शोध घेणे गरजेचे आहे. या हेरगिरीसाठी कुणी पैसा दिला हे समोर आले पाहिजे अशा शब्दांत त्यांनी केंद्रावर अप्रत्यक्ष टीका केली. याशिवाय राज्यातील पूरग्रस्त भागात मदत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री वेगवान पद्धतीने काम करत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
हेरगिरीसाठी पैसे कुणी दिले?
राजकारणात हेरगिरी करणे हे काही नवीन नाही. मात्र पेगासस हेरगिरीच्या बाबतीत बोलायचे झाले तर या हेरगिरीसाठी किमान साडेतीनशे कोटींचा खर्च आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हेरगिरीसाठीचे पैसे कुणाच्या खात्यातून दिले गेले याचा शोध घेणे गरजेचे आहे असे राऊत रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले. या हेरगिरीबद्दल संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. देशात अशा घटना आता वारंवार होत आहेत. हे कोण करत आहे, कुणाला विरोधकांची भीती वाटते आहे याचा खोलवर तपास करणे गरजेचे आहे असे राऊत म्हणाले.