मुंबई -सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणुक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनीही ट्वीट करत सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
सीबीआय तपासातून काय निष्पन्न झाले - नवाब मलिक
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला होता. तसेच ही केस सीबीआयकडे देण्याची मागणी केंद्र सरकारला केली होती. परंतु यातून निष्पन्न काय झाले, असा प्रश्नही नवाब मलिक यांनी केला आहे. एक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही. त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती, तर त्याचा हत्या कोणी केली, हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.