मुंबई -दररोज सकाळी कार्यालय गाठण्यासाठी तर, सायंकाळी घराच्या दिशेने रवाना होणाऱ्या लाखो चाकरमान्यांची गर्दीची वेळच मुंबईतील रस्ते वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरताना दिसत आहे. त्यात विकासकामांमुळे अरुंद झालेले महामार्ग कोंडीत भर घालत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला ( Amruta Fadnavis Mumbai Trafic Jam Statement ) आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीवर ईटीव्ही भारताचा हा विशेष ( Reason Behind Traffic Jam In Mumbai ) रिपोर्ट..
वाहतूक तज्ज्ञांचे मत
मुंबईला उपनगरांशी जोडणाऱ्या पश्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गावर सकाळी व सायंकाळी लाखो वाहन चालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सकाळी मुंबईच्या दिशेने येताना दक्षिण वाहिनीवर तर, सायंकाळी मुंबईतून बाहेर पडताना उत्तर वाहिनीवर वाहतूक कोंडी होते. महत्त्वाची बाब म्हणजे सकाळी दक्षिण वाहिनीवर कोंडी असताना उत्तर वाहिनीवरून वाहने सुसाट धावताना दिसतात. याउलट सायंकाळी उत्तर वाहिनीवर कोंडी असताना दक्षिण वाहिनीवर वाहनांचा दुष्काळ दिसतो. लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉममुळे कार्यालय बंद असल्याने मुंबईतील रस्त्यांनी कोंडीतून मोकळा श्वास घेतला होता. मात्र, कार्यालय पुन्हा सुरु झाल्यानंतर ही कोंडी पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, कार्यालयीन वेळेत बदल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला कॉर्पोरेट कंपन्यांसह मार्केटवासियांनी बगल दिल्याने ही कोंडी सुटण्याचे नाव घेत नसल्याचे वाहतूक तज्ज्ञ सुभाष गुप्ता सांगतात.
'या' परिसरात होते वाहतूक कोंडी
मुंबईत डी.एस.पी. मुखर्जी चौक, काळाघोडा, जोहर चौक उर्फ भेंडी बाजार, नाना चौक, हाजिअली येथील वत्सलाबाई देसाई चौक, भायखळ्यातील खडा पारसी, हिंदमाता, खोदादाद सर्कल (दादर टीटी), वडाळा पूल, सायन येथील राणी लक्ष्मीबाई चौक, कलानगर येथील खेरवाडी जंक्शन, सुमन नगर जंक्शन, जिजामाता भोसले मार्ग जंक्शन, साकी नाका येथील दत्ता सामंत चौक, पवईतील हिरानंदानी परिसर, सी.डी. बर्फीवाला रोड, चार बंगला येथील डी.एन. नगर, चकाला हायवे येथील बहार सिनेमासमोर, जोगेश्वरीतील बेहराम बाग, आरे कॉलनी, दिंडोशीतील ए.के.वैद्य जंक्शन, आकुर्ली रोडवरील समता नगर जंक्शन, इनऑर्बिट मॉल, मुलुंडच्या सोनापूर येथील हेडगेवार चौक या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होताना दिसते.
इतका होतो इंधनावर खर्च
गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाने एक सांशोधन केले होते. ज्यात मुंबईतील काही परिसरातील पाहणी केली होती. ज्यात लक्षात आले की, मुंबईतील खड्डे व वाहतूक कोंडी नसताना दोन किमीचा रस्ता ओलांडण्यासाठी अवघा १० मिनिटांचा वेळ लागत होता. तो आता ७५ मिनिटांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे प्रवासाचा वेळ ६५ मिनिटांनी वाढला आहे. मुंबईत दररोज सरासरी पन्नास किलोमीटर प्रवास होत असतो. यासाठी दररोज दोन ते तीन लिटर पेट्रोल अथवा डिझेल, सीएनजी या इंधनाचा खर्च होतो. म्हणजे इंधन खर्च दोनशे आणि टोल आणि गाडीचा देखभाल, पार्किंग असा खर्च याचा विचार केला तर, सरासरी आपल्या वाहनावर दररोज ३०० रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग स्वीकारून गरजेचे आहेत.
मुंबईत ३५ लाख वाहने
मुंबई नजीकच्या शहरांतून सकाळी व गर्दीच्या वेळी येताना वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र, तरी सुद्धा शासनाचे प्रयत्न अपुरे पडताना दिसून येत आहे. आजघडीला मुंबईची लोकसंख्या सुमारे एक कोटी ३० लाख इतकी आहे. शहराचं क्षेत्रफळ सुमारे ४३८ चौरस किलोमीटर आहे. मुंबईत सध्या सुमारे ३५ लाख वाहने असून प्रति हजार व्यक्ती ३६१ जणांकडे स्वतःचे खासगी वाहन आहे. सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. तरी दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत जात असल्याने मुंबईतील रस्ते अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे आज राज्यभरतील सर्वाधिक अपघात मुंबईत होतात. राज्यात गेल्यावर्षी २०२०च्या तुलनेत रस्ते अपघातांत वाढ नोंदवण्यात आली असून, सर्वाधिक अपघात हे मुंबईत झाले आहेत. मुंबई गेल्या वर्षी अपघातांची संख्या ९१० वरून १ हजार १३४ पर्यंत वाढली आहे.
वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी शासनाकडून प्रयत्न
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो रेल्वे जाळे तयार करण्यात येत आहे. मुंबई आणि उपनगरला जोडणाऱ्या कोस्टल रोडचे काम सुरु आहे. याशिवाय जल वाहतुकीसाठी शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या वर्षीपासून मुंबईत रोरो बोट सुरू करण्यात आली आहे. आता वॉटर टॅक्सी सेवा सुद्धा होणार आहे. तर परिवहन विभागाकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शेकडो ट्रॅफिक मास्टरची मदत घेतली जात आहे. याशिवाय सामाजिक संस्थेचे समाजसेवक वाहूतक कोडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत करते.