मुंबई -शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक यांच्या पत्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे नमूद आहे. हा आरोप गंभीर असून सर्वांनी त्याचा अभ्यास करावा, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
सरनाईकांनी लावलेले आरोप गंभीर -
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आघाडीच्या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून विनाकारण त्रास देण्यात येत असल्याची खदखद प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देण्यासारखे काहीही नाही. मुळात ते पत्र जर खरे असेल, तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे त्यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. हा आरोप गंभीर आहे. त्यामुळे विनाकारण कोण कोणाला त्रास देत आहे? तो विनाकारण त्रास काय आहे?' याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले.