मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ड्रग्ज प्रकरणावरून ढवळून निघाले आहे. आज पत्रकार परिषद घेत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत, असा आरोप केला. अमृता फडणवीस यांच्या नदी पुनरुज्जीवनाचा संदेश देण्यासाठी गायलेल्या एका गाण्याला जयदीप राणा यांनी अर्थपुरवठा केल्याचे मलिक यांनी म्हटलं आहे.
मलिकांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'रिव्हर मार्च'ची ही संघटना नदी पुनरुज्जीवनाचं काम करते. या मोहिमेच्या प्रचारासाठी त्यांनी एक गीतही रेकॉर्ड केलं होतं. यात अमृता फडणवीसांनी गाणे गायलं होतं. मलिक यांनी उल्लेख केलेला व्यक्ती हा 'रिव्हर मार्च'च्या टीमसोबत आला होता. त्या संघटनेच्या क्रिएटिव्ह टीमनं त्याला हायर केलं होतं. त्याच्यासोबत माझाही फोटो आहे. पण माझा किंवा माझ्या पत्नीचा संबंधित व्यक्तीशी अजिबात संबंध नाही. तसेच जयदीप राणा यानं कुठल्याही प्रकारचा अर्थपुरवठा केलेला नाही हे रिव्हर मार्च संघटनेनंच स्पष्ट केलंय,' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.