मुंबई- काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवरील एक जागेसाठी आघाडी सरकारकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यसभेवरची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली आहे. मात्र राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्र फडणीस यांनी आघाडी सरकार समोर एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार भारतीय जनता पक्षाचे निलंबित बारा आमदारांचे निलंबन मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकार समोर ठेवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यातील नक्षलवाद आणि ओबीसी आरक्षण अध्यादेश बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती सह्याद्री अतिथीगृहात असलेल्या बैठकीत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणीस यांची घरी जाऊन भेट घेतल्यामुळे देखील दोन्ही पक्षाची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.
प्रस्तावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी नाराज
राज्यसभेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाकडून ठेवण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत काँग्रेस सकारात्मक असली तरी आघाडी सरकार मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रस्ताव मंजूर नसल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे. याआधीही राज्यसभेवरील एक जागेसाठी असलेली निवडणूक संख्याबळावर आपण जिंकू असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ठेवलेल्या या प्रस्तावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा रस दिसत नाही.